शाळेचे दिवस
शाळेचे दिवस पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकाच्या गजबजलेल्या रस्त्याने जाताना, नूमवि शाळेची दिमाखदार इमारत दिसते. असंख्य कमानींनी नटलेली ही भव्य इमारत, शनिवारवाडा किंवा तशाच एखाद्या पुरातन, ऐतिहासिक किंवा खूप मोठ्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या, प्राचीन वास्तू सारखीच नेहमी वाटते. असंख्यवेळा या रस्त्याने जाताना, सकाळी, दुपारी, रात्री, गर्दी असताना किंवा गर्दी नसताना, अनेक वेगवेगळ्या मनाच्या अवस्थांमधून लक्ष असताना किंवा नसताना, प्रत्येक वेळी या वास्तूने लक्ष वेधून घेतले आहे. माझ्या मुलाला प्रत्येक वेळा शाळेवरून जाताना, ही बघ आमची शाळा, असे सांगितले, की माहिती आहे हो आणि तुम्ही कितीवेळा दाखवणार आहात, असे म्हटले, तरी 'ही बघ आमची शाळा' या वाक्यांमध्ये काय अर्थ दडला आहे हे त्या बिचार्याला कसे कळणार ! या शाळेने जे काही आमच्या जीवनात संस्कार केले, त्या संस्कारातून उतराई होण्याचा एक पळपुटा प्रयत्न किंवा त्या संस्कारांची आठवण म्हणूनच कदाचित, ही बघ आमची शाळा, असे उद्गार आपोआप तोंडी येत असावेत. आमच्या नुमवि शाळेचे लहान आणि मोठी म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन भाग होते. पैकी मोठी शाळ...