पुणेकर रसिक श्रोते ..... पुणेकर श्रोता तुम्हाला ओळखायचा असेल , तर तुम्हाला स्वत:ला उत्तम स्वरज्ञान हवे. म्हणजे काय तर बोलाणाऱ्याचा सूर ओळखता यायला हवा. याचा अर्थ समस्त पुणेकर मंडळी संगीतात बोलतात असे नाही , तर त्यांच्या संभाषणाचा सूर ओळखता यायला हवा , त्यांना काय म्हणायचे आहे , हे तुम्हाला कळायला हवे , नाही तर तुम्हाला कसे सहज खिशात टाकले , हे गावभर होणार किंवा तुम्हाला फ़ारसे काही समजत नाही , अशी किंवा तुमची कशी विकेट घेतली , याची ही पुणेकर मंडळी मजा घेणार. कल्पना करा एखाद्या कार्यक्रमाचे तिकिट तुम्ही काढायला गेला आहात आणि तुमच्या शेजारी एक पुणेकर गृहस्थ उभे आहेत. त्यावेळच्या त्यांच्याशी झालेल्या संवादावरून मी काय म्हणतो याचा थोडा अंदाज येईल. सहसा पुणेकर स्वत:हून दुसऱ्याशी बोलायला जात नाहीत. पण सार्वजनिक ठिकाणी जिथे फ़ारसा धोका नसल्यास , कधी कधी स्वत:हून बोलतातही. धोका याचा अर्थ तिकिटांसाठी खूप गर्दी असणे , तिकिटे मिळायच...