शाळेचे दिवस

शाळेचे दिवस

पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकाच्या गजबजलेल्या रस्त्याने जाताना, नूमवि शाळेची दिमाखदार इमारत दिसते. असंख्य कमानींनी नटलेली ही भव्य इमारत, शनिवारवाडा किंवा तशाच एखाद्या पुरातन, ऐतिहासिक किंवा खूप मोठ्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या, प्राचीन वास्तू सारखीच नेहमी वाटते. असंख्यवेळा या रस्त्याने जाताना, सकाळी, दुपारी, रात्री, गर्दी असताना किंवा गर्दी नसताना, अनेक वेगवेगळ्या मनाच्या अवस्थांमधून लक्ष असताना किंवा नसताना, प्रत्येक वेळी या वास्तूने लक्ष वेधून घेतले आहे. माझ्या मुलाला प्रत्येक वेळा शाळेवरून जाताना, ही बघ आमची शाळा, असे सांगितले, की माहिती आहे हो आणि तुम्ही कितीवेळा दाखवणार आहात, असे म्हटले, तरी 'ही बघ आमची शाळा' या वाक्यांमध्ये काय अर्थ दडला आहे हे त्या बिचार्‍याला कसे कळणार ! या शाळेने जे काही आमच्या जीवनात संस्कार केले, त्या संस्कारातून उतराई होण्याचा एक पळपुटा प्रयत्न किंवा त्या संस्कारांची आठवण म्हणूनच कदाचित, ही बघ आमची शाळा, असे उद्गार आपोआप तोंडी येत असावेत.

आमच्या नुमवि शाळेचे लहान आणि मोठी म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन भाग होते. पैकी मोठी शाळा म्हणजे खरोखरच मोठी आणि भव्य होती, आणि अजूनही आहे. किरकोळ स्वरूपाचे काही बदल, जे आम्हाला खूप मोठे वाटतात, ते सोडले, तर शाळा आहे तशीच आहे. या वास्तूच्या देखणेपणाला हात लावण्याची हिंमत, कोणत्याही इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे नाही. पुणे शहराला भूषण असलेला लक्ष्मी रस्ता, आप्पा बळवंत चौक, शनिवार, नारायण, शुक्रवार, बुधवार आणि सदाशिव या पुण्याच्या जवळजवळ सर्वच मुख्य पेठांच्या सीमेलगत असलेली ही वास्तू. लोखंडी प्रवेशद्वार व हे द्वार बंद झाल्यावर उशिरा येणाऱ्यांसाठी आत जायचा छोटेखानी रस्ता. शाळेच्या इमारतीच्या भव्यतेस शोभणारा भरभक्कम मिशांचा शिपाई भैय्याजी, म्हणजे खास वैशिष्ट्यपूर्ण होता. आज-काल मनात येणारे, हा बिहारी असेल की पंजाबी की कोठचा होता माहिती नाही, पण चांगले मराठी न येणारा  पिळदार मिशांचा भैय्याजी, एवढी त्याची ओळख पुरेशी होती. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच शिक्षा देण्यात ग भा रानडेसरांबरोबर भैय्याजीची उपस्थिती, ही उशीर झाल्यामुळे, घाबरगुंडी उडालेल्या अवस्थेची तीव्रता वाढवणारी असे. शाळेची इमारत कोणत्या वास्तुविशारदाने बांधली माहिती नाही, पण शाळेच्या इमारतीच्या देखणेपणात, नाट्य आणणारा शाळेच्या मधोमध असलेला पूल ! 'हाती घ्याल ते तडीस न्या' असे लिहिलेली भव्य गॅलरी, त्याखाली विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा प्रेरणादायी पुतळा, प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मुख्याध्यापकांच्या किंवा पर्यवेक्षकांच्या कचेरीकडे जाणारा गोल जिना, तिथले भांडार, मुले म्हणजे फुले, याची शिक्षकांना आठवण देण्यासाठीच जणू काय बांधलेली छोटेखानी बाग, सगळेच वैशिष्ट्यपूर्ण होते ! आजच्या मंगल कार्यालयातही नसतात, एवढी हात धुण्याची बेसिन व त्यावरील आरसा, म्हणून प्रचलित असलेला आरसे-महाल. मध्यभागी पुलाला लागून असलेले सभागृह, हे काही देखणे वगैरे नव्हते, उलट फारसा उजेड नसलेले व केवळ जुनाट, एवढ्या एकाच शब्दात वर्णन करता येऊ शकणारे असले, तरी भव्य मात्र होते. या सभागृहाची रचना, हे खास ब्रिटिश काळाची किंवा थेट कलकत्त्याच्या प्रसिद्ध कॉफी हाऊसची आठवण करून देणारी होती. त्या सभागृहातील बाके मात्र, खरोखरच ब्रिटीशांचीच असावीत अशी होती. एका बाकावर सात-आठ मुले तरी बसत. गमतीचा भाग म्हणजे, त्या बाकाची पाठ फिरवून समोर त्याचे डेस्क होत असे. मुख्याध्यापकांच्या, शिक्षकांच्या प्रत्येक सभेत त्या भाषणांपेक्षा पेक्षा एकदा तरी, या पाठीचे डेस्क करायला मिळावे, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात एकदा तरी नक्कीच डोकावून जात असे. आजही अनेक वर्षांनंतर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत जमल्यावर, प्रत्येकाला या वास्तूतून चक्कर मारून मिळणारे समाधान, लौकिकातील कोणत्याच साधनांनी मोजता येणार नाही.



आमच्या पिढीला पुलंच्या चितळे मास्तरांच्या तात्या-पंतोजी शिक्षकांची अगदी शेवटची पिढी दुर्दैवाने किंवा सुदैवाने पाहायला अनुभवायला मिळाली. दुर्दैवानी अशासाठी, की या पिढीचे अधिक संस्कार आमच्यावर होऊ शकले नाहीत आणि सुदैवाने अशासाठी कि चिं द पटवर्धन, लंके सर, मोडक सर, ग य दिक्षित सर, डी के डी सर, मा य ओक अशा थोड्या का होईना, पण या शिक्षकांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी, जन्मभर पुरेल एवढी मिळाली. या सर्वांची शिस्त आणि दरारा एवढा होता, की जी, एच अशा तुकड्यातील ढ किंवा नाठाळ मुलांनाही या शिक्षकांच्या दराऱ्याने पळता भुई थोडी होत. शिस्तीप्रमाणेच या प्रत्येक शिक्षकांची आपल्या हातून घडणारा विद्यार्थी सुसंस्कृत व सुविद्य म्हणून ओळखला जावा, अशी तळमळ असे. या तळमळीतला प्रामाणिकपणा, प्रत्येक विद्यार्थ्यालाही जाणवत असे, म्हणूनच कोणाही विद्यार्थ्यांची, त्यांच्या आज्ञेबाहेर जाण्याची इच्छाही होत नसे. आपल्या शिक्षकांनी सांगितल्यावर, मी हे का करायचे, असा संशय कोणाच्याही मनात उत्पन्न होत नसे, कारण त्यांनी सांगितलेले सर्व आपल्या भल्यासाठीच आहे, यावर हुशारांपासून नाठाळ म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास विश्वास होता. म्हणूनच लंके सरांनी किंवा अनेक शिक्षकांनी शिकवलेल्या किंवा अभ्यासाव्यतिरिक्त लिहून दिलेल्या मराठीतल्या उत्तमोत्तम कविता, उतारे हेच आज त्यांनी मारलेल्या वेताच्या छडीच्या मारा पेक्षा अधिक स्मरणात आहेत.

या धोतरवाल्या शिक्षकांच्या पिढीही नंतर शर्ट पॅन्ट किंवा बुशकोट पण त्याच मुशीतून आलेल्या शिक्षकांची दुसरी पिढी शाळेत प्रवेशली होती. सर्वश्री ग य दीक्षित, म वा जोशी, द के देशपांडे, मा य ओक, वि य कुलकर्णी, न म जोशी, ल पं जांभोरकर, ज गं फगरे, बा गो परांजपे अशी कितीतरी नावे. प्रत्येकाचे काही ना काही खास वैशिष्ट्य होते. लेले सर, ब मो पुरंदऱ्यांच्या राजा शिवछत्रपती मधील स्फूर्तीप्रद उतारे वाचून दाखवत असत, तर विद्यार्थ्यांना अजिबात गम्य नसलेल्या, तत्कालीन राजकीय परिस्थितीवर, पोटतिडकीने बोलताना भालेराव सरांचे हरपलेले देहभान पाहून, कधीकधी मुलांची करमणूकही होत असे. डीपी जोशी सरांचे कागदावरचे कातरकाम केवळ पहात रहावे असे होते. ही पण पिढी पैसा, मान मरातब या सर्वांपासून दूर केवळ ज्ञानदान हेच कर्तव्य मानणारी होती. शाळेत शिकवण्यापेक्षा खाजगी क्लासेस घेऊन, ऑफिस, रिसेप्शनिस्ट, गाडी, घर याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवून, विद्यादानाला आयुष्याची इतिकर्तव्यता मानणारी होती. कदाचित सगळेच शिक्षक इतके निष्ठावान नसतीलही. त्यांनाही शिक्षकी पेशाच्या ओढगस्तीच्या जीण्याचा कधी कंटाळा येतही असेल. पण हे त्यांनी कधी जाणवू दिले नाही किंवा शाळा सोडून स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीला प्राधान्य देत, या चौकटीला छेद देण्याचा विचार, त्यांच्यावरील संस्कार त्यांना करू देत नसावा. चित्रकलेच्या राजे, कवठेकर आणि केसकर सरां पैकी केसकर सरांचा, 'हाती घ्याल ते तडीस न्या' इथल्या वर्गातील उंचच उंच सरकता फळा, हा विद्यार्थ्यांना चित्रा पेक्षाही ही अधिक आकर्षित करणारा होता ! ताडफळे सरांचा हस्तव्यवसायाचा तासही मजेशीर असे. सातवी-आठवीत असताना हस्तव्यवसाय म्हणून वही कशी बनवायची, याचे वर्णन वर्षभर वहीत लिहून लिहून, लिहिण्याची वही फाटायची वेळ येत असे !

नंतरच्या शिक्षकांच्या पिढीने मात्र कात टाकली. नवीन स्कूटर वरून शाळेत येणाऱ्या शिक्षकांची ही पिढी, शिक्षकी पेशाच्या बदलाचे संकेत देणारी आहे हे जाणवत होतं. शाळेतून रिटायर व्हायला आलेल्या शिक्षकांच्या हाताखाली शिकलेली ही पिढी आणि नव्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वातील भारदस्तपणा, बदलत्या काळानुसार नाहीसा होत गेला. म वा जोशी यांचा आचार्य अत्रे यांसारखा कोट पँट असा पेहराव, तसाच चष्मा, तशीच देहयष्टी यामुळे मुख्याध्यापक असेच रुबाबदार हवेत असे वाटत असे. ग य दीक्षित, जोशी हे सर्व वर्गात तास घ्यायला येत असत. त्यांच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाबरोबरच, त्यांचा दराराही तितकाच होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील मोठेपणामुळे एक भीतियुक्त आदर त्यांच्यात आणि आमच्या ठराविक अंतर ठेवण्यास भाग पाडे.

त्यावेळेस शहरही तसे तेवढे मोठे नव्हते, त्यामुळे शाळाही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच होत्या. त्यातही शनिवार, नारायण, कसबा, शुक्रवार आणि सदाशिव पेठातील मुलांची आणि त्यांच्या पालकांची प्रथम पसंती अर्थातच नूमवि ला होती. मुलांच्या हट्टाला त्यावेळी घरात किंमत दिली जात नसे, हट्ट केल्यावर पुढ्यात वस्तू हजर करणाऱ्या पालकांची आणि कॅडबरीने दात किडणाऱ्या मुलांची पिढी अजून जन्मली नव्हती. पुण्यात रिक्षा भरपूर असून रिक्षा काका ही जमात तयार व्हायची होती. जवळपासच्या दोन-चार पोरांच्या घोळक्यात पोरे गेली, की संध्याकाळी ठरलेल्या वेळी घरी परतणार, याची पालकांना खात्री असे. तऱ्हतऱ्हेच्या आज-काल आढळणाऱ्या रंगीबेरंगी स्कूल बॅग्स ऐवजी, पूर्ण पाचवी ते दहावी एकच खाकी रंगाचे दप्तर असे. एखाद्या श्रीमंत मुलाकडे तोही वर्गात एखादाच असे, त्याकडे ॲल्युमिनियम ची सुटकेस सारखी कडी-कोयंडे वाली बॅग असे. ॲल्युमिनियम बॅगवाल्या मुलाचा गणवेशही टेरीकॉटचा असे, बाकी सगळे कॉटनवाले ! तलम टेरीकॉटचे कपडे, ॲल्युमिनियमची बॅग, सोडायला येणारा ड्रायव्हर, याबरोबरच घरगड्याने मुलाला सायकल वरून शाळेत सोडणे, हेदेखील श्रीमंतीचे लक्षण होते. ही श्रीमंत मुले वर्गात शिरेपर्यंतच वेगळी वाटत, पण एकदा वर्गात शिरली की कोणालाच काही वेगळे वाटत नसे. प्रत्येक शाळेत असणारी हुशार मुले, ढ मुले जशी असतात, तशीच आमच्या शाळेतही होती. पण एकूणच शाळेच्या जडणघडणीमुळे, संस्कारांमुळे कि कशामुळे माहिती नाही, एक स्मार्टनेस, थोडासा व्रात्यपणा, इरसालपणा किंवा खास पुणेरी म्हणून चारचौघात उठून दिसणारा विशेष गुण आमच्या शाळाबांधवांनी आजही अर्थातच अभिमानाने जपला आहे ! किंवा तेच नूमविचे वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही ! त्यामुळे आजही एखाद्या लग्नमंडपात किंवा असंख्य अनभिज्ञ अपरिचितांच्या मेळाव्यात गप्पा सुरु झाल्या, की एक नूमविय दुसऱ्या नूमवियाला सहज ओळखू येतो त्यात विशेष काही नाही.

शाळा सोडून अनेक वर्षे झाली, तरी महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा, भेटणाऱ्या असंख्य तुकड्या नियमितपणे किंवा अनियमितपणे हमखास भेटतात, इतकेच काय, शाळेतील निवृत्त शिक्षकही शाळेत नियमित भेटतात. वर्षानुवर्षे भेटणार्‍या बॅचेस आहेतच, पण या सर्वांची आम्ही नुमवीय यासारखी महा बॅच केवळ शाळेच्या ओढीने जमते आणि तीही फक्त नूमवियांचीच. काही वर्षांपूर्वी आमच्या बॅचला पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्याप्रीत्यर्थ, आमच्या मेळाव्याला आमच्या शिक्षकांनाही आम्ही पाचारण केले होते. त्यांना आमंत्रण देण्यासाठी आम्ही एका सरांच्या घरी गेलो, तर सर म्हणाले, मला बोलावू नका, मी तुम्हाला आवडेल असे बोलणार नाही. मी एकदा रस्त्यातून जाताना, भर गर्दीत एक आलिशान मोटार थांबली, त्यातून एक विद्यार्थी व मोठा झालेला माणूस उतरला, भर गर्दीत त्याने मला वाकून नमस्कार केला, अशा थापा मी मारणार नाही ! या सरांच्या उद्गारांनी आम्ही चकीत झालो. आम्ही खरेच काही भव्यदिव्य केले नाही, आमच्या शिक्षकी पेशाचे उदात्तीकरण करून, उगीच आम्हाला मोठे करू नका. आम्ही केवळ आमच्या पोटासाठी काम करत होतो. खरं म्हणजे, असा प्रांजल कबुलीजबाब देणारे, केवळ विद्यादानाच्या कामाशी एकनिष्ठ राहिलेले, विद्येबरोबरच अवघ्या जीवनाचा रसास्वाद, उघड्या डोळ्यांनी घ्यायला लावणारे शिक्षक आम्हाला आणि शाळेला लाभले. त्यामुळे शाळेची ओळख नुसत्या नूमवि एवढ्या शब्दांनी संपत नाही ....

©हेमकांत नावडीकर
नूमविय ७७

Comments

Popular posts from this blog

पुणेरी खाद्य संस्कृती...